जनावरांतील लंगडणे – कारणे व प्रथमोपचार

जनावर लंगडणे (Cattle Lameness) हा फार मोठा आजार असून त्यामध्ये जनावरांच्या पायास असह्य वेदना होतात, परिणामी चालतांना त्यांचे हाल होतात. म्हणजेच व्यवस्थितरित्या चालता येत नाही आणि ते लंगडतात. या लेख मध्ये जनावरांतील लंगडणे, कारणे आणि प्रथमोपचार याबद्दल सविस्थर माहिती दिलेली आहे.

लंगडण्याची कारणे :

  1. मार लागणे किंवा पाय लचकल्यामुळे
  2. सांध्यामध्ये व्यंग आल्यास
  3. हाडांना इजा झाल्यास किंवा हाडाचा आजार झाल्यास
  4. सांधे सुजल्यामुळेहि जनावरास नीट चालता येत नाही
  5. खुरांमध्ये तर काटे किंवा इतर काही टोकदार टोचल्यामुळे
  6. सांधा निखळल्यामुळे

लंगडण्याचे प्रकार :

  1. जनावर उभे असताना लंगडणे : या प्रकारात जनावर एका जागेवर उभे असतांना पाय वर धरून ठेवते आणि पाय मागे-पुढे करत असतात तसेच कोणत्याही प्रकारचे वजन तोलू शकत नाही यामध्ये जनावरांच्या खुरांचे आजार, स्नायूंचे दुखणे कारणीभूत ठरते.
  2. चालतांना जनावर लंगडते : या प्रकारात जनावर शांत उभे राहते, परंतु चालतांना जनावर अडखळते किंवा लंगडत चालते काही जनावरांमध्ये सकाळी त्यांना सोडल्यानंतर ते थोडा वेळ पाय झाडून (सरपटत) चालतात यांमध्ये सांधेदुखी, संधिवात या आजारांचा समावेश असतो
  3. उभे असतांना व चालतांना लंगडणे : या प्रकारात जनावर उभे असतांना व चालतांना लंगडते यांमध्ये अस्थिव्यंग, सांधा निखळणे यांचा समावेश होतो

प्रथमोपचार : 

जनावरांचे निरीक्षण करून लंगडण्याचा प्रकार समजून घ्यावा आणि त्यानुसारच उपचार करणे फायदेशीर ठरते.

  1. पांगळेपणा किंवा अर्धांगवायूमुळेही जनावर लंगडते तसे असल्यास ‘ब’ जीवनसत्वाचे इंजेक्शन द्यावे व त्यासोबत वेदनाशामक इंजेक्शन पशुवैद्यकियांमार्फत दिले गेले पाहिजे.
  2. क्षारांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या लंगडण्यामध्ये केल्शियम, फॉस्फरस क्षार व ड जीवनसत्वाचे पशुवैद्यकीयामार्फत इंजेक्शन द्यावे.
  3. सांधेसुजीमुळे लंगडत असेल तर प्रतिजैविके व वेदनाशामक इंजेक्शन पशुवैद्याकीयामार्फत द्यावे.
  4. अस्थिव्यंग असल्यास संबंधित भागावर पशुवैद्यकियाकडून प्लास्टर करून घ्यावे व प्रतिजैविके, वेदनाशामक इंजेक्शन दिले गेले पाहिजे.
  5. मार लागलेल्या भागावर किंवा सुजलेल्या भागावर आयोडेक्स किंवा मोहरीचे तेल लावून हाताने चोळावे.
  6. सुजलेले स्नायू, अंगठा व इतर बोटांच्या साह्याने दाबून खालून-वरच्या दिशेने चोळावे.
  7. मार लागलेल्या भागास गरम शेक सुद्धा दिल्यास फरक जाणवतो तसेच वर नमूद केलेल्या लक्षणांत पशुवैद्यकीयांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आजाराचे योग्य निदान होऊन उपचार करवून घेतले असता जनावर लवकरात लवकर पुर्वस्थितीत येण्यास मदत होईल.

 

Read: बायपास फॅट तंत्रज्ञान: दुभत्या गायी-म्हशींसाठी वरदान


श्री. अजय गवळी
लेखक पशुसंवर्धन तज्ञ असून बर्ग अँड स्मिथ इंडिया प्रा. ली. पुणे
येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत
मोबाइल नंबर: ८००७४४१७०२