मोलॅसिस चा (उसाची मळी) जनावरांच्या आहारात उपयोग

मोलॅसिस हा एक गडद तपकिरी, चिकट द्रवरूप पदार्थ आहे, जो ऊस किंवा शुगरबीट (शर्कराकंद) पासून साखर बनविताना (बाय प्रॉडक्ट म्हणून) तयार होतो. उच्च तापमानावर साखर विरघळल्यानंतर, साखरेची स्फटिके खाली जमा होतात, वरील तरल पदार्थ थंड झाल्यावर मोलॅसिस तयार होते. मोलॅसिस जनावरांसाठी लागणाऱ्या ऊर्जेचा आणि खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच खाद्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी देखील मोलॅसिस चा चांगल्या प्रकारे वापर करता येतो. ऊसाच्या साखरेपासून बनलेल्या मोलॅसिस मध्ये कॅल्शियम चे प्रमाण १ % पर्यंत असते, याउलट फॉस्फरस ची मात्रा कमी असते. त्याचबरोबर सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ची प्रमाण देखील जास्त प्रमाणात आढळून येते. मोलॅसिस मध्ये तांबे, जस्त, लोह आणि मॅंगनीज सारख्या ट्रेस खनिजांची (ज्यांची गरज शरीराला कमी प्रमाणात असते) मात्रा आढळून येते. निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यासोबत मोलॅसिस दिल्यास, खाद्य सेवन करण्याचे प्रमाण तसेच पाचनक्षमता सुधारते. परिणामी शरीरामध्ये पोषण मूल्यांचे जास्त प्रमाणात शोषण केले जाते. विण्या अगोदर साधारणतः जनावर खाद्याचे सेवन कमी करते, अशा वेळेस मोलॅसिस चा वापर करून खाद्याची तसेच एकूण आहाराची गुणवत्ता वाढविता येते.

मोलॅसिस तयार होण्याची प्रक्रिया

फायदे :

  • पचण्यायोग्य उर्जा जास्त प्रमाणात मिळते
  • डीग्रेडेबल प्रथिनांची जास्त मात्रा
  • पचायला सोपे
  • कमी प्रथिने असलेल्या खाद्य घटकाला पूरक
  • फ्री फ्लोइंग द्रवरूप पदार्थ
  • कॉपर ची जास्त मात्रा
  • आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रतीचं खाद्य
  • दुग्धोपादनात तसेच स्निग्धांशा मध्ये वाढ
  • जनावरांच्या तब्येतीत सुधारणा
  • खाद्यातील तंतुमय पदार्थांच्या पचनक्षमतेत वाढ
  • उन्हाळ्यामधील ताण तणाव कमी होण्यास मदत
  • खाद्यामध्ये ‘बाइंडिंग एजन्ट’ म्हणून

मोलॅसिस मधील पोषणमूल्यांचे प्रमाण:

खाद्य घटक प्रमाण
क्रूड प्रोटीन (कच्ची प्रथिने) ७४ %
ड्राय मॅटर (शुष्क पदार्थ) ६.५ %
ऑइल (तेल) कमी प्रमाणात
एन. डी. एफ. —-
स्टार्च कमी प्रमाणात
शुगर ६५ %
एम. इ, (एम. जे. / किलो ड्राय मॅटर) १२.५

मोलॅसिस मधील ट्रेस खनिजांचे प्रमाण:

खनिज मोलॅसिस मधील प्रमाण (p.p.m.)
कोबाल्ट ०.६
बोरॉन ३.०
आयर्न ११५.०
कॉपर ४.९
मँगेनिझ १८.०
मॉलिब्डेनम ०.२
झिंक ३४.०

आहारातील मात्रा :

प्रत्येक गाईमागे मोलॅसिस प्रतिदिन ३ किलो पर्यंत देता येते.  तसेच मांस उत्पादनासाठी, जनावरांच्या आहारात १० % पर्यंत समाविष्ट करता येते. सदर मात्रा हि आहारातील इतर खाद्य घटकांवर तसेच त्यांच्या साठवणुकीच्या सुविधांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे चार आठवड्यापुढे वय असणाऱ्या जनावरांना देखील १०% पर्यंत मोलॅसिस आहारामधून देता येते. साधारणतः मोलॅसिस पाण्यामध्ये मिक्स करून आधी डायल्यूट केले जाते. मोलॅसिस विविध स्वरूपात तसेच विविध प्रमाणात दिले जाते. सर्वात उत्तम उपाय म्हणून गव्हाणीमधील चाऱ्यावर हे मोलॅसिस मिश्रण शिंपडता येते. खाद्य घटकांना मोलॅसिस चिटकून बसल्यामुळे जनावराला ते खाद्यातून वगळता येत नाही. पाणी आणि मोलॅसिस मिश्रण ४-६:१, २-४:१, २:१ या प्रमाणात बनविता येते.

भाकड जनावरे: ०.५ -१ किलो प्रतिदिन

दुधाळ जनावरे: ०.५ -२ किलो प्रतिदिन

वासरे आणि कालवडी: १०० ग्रॅम्स ते ५०० ग्रॅम्स प्रतिदिन

वयात आलेली (ऍडल्ट) जनावरे: १ किलो प्रतिदिन

व्यायल्यानंतर: २४० मिली कोमट पाण्यामध्ये

शेळ्या आणि मेंढ्या:

गाभण आणि दुधाळ: १०० ग्रॅम्स ते २०० ग्रॅम्स प्रतिदिन

घोड्यांमधील मात्रा:

१-२ किलो / ४५० किलो वजनामागे दिवसातून दोनदा किंवा तीनदा

जनावरांच्या खाद्यात मोलॅसिस वापरण्याचे प्रमाण:

खाद्य मोलॅसिस चे प्रमाण 
काफ फीड्स ५ %
काफ नुट्रीशन मिल्स ५ %
डेअरी कॅटल फीड्स १५ %
मिल्क प्रोड्युसिंग फीड्स १५ %
कॅटल फेटनिंग फीड्स २० %

मोलॅसिस ची विषबाधा:

मोलॅसिस ठरल्यापेक्षा जास्त प्रमाणात दिल्यास विषबाधा होऊ शकते. मोलॅसिस ची विषबाधा झालेले जनावर लाळ गाळते, तसेच त्याना नीट उभे राहता येत नाही. सहसा त्यांचे डोके खाली झुकलेले असते. यामध्ये जनावर विचलित तसेच अस्थिर राहते. जनावराच्या दृष्टीवर परिणाम होऊन ते आंधळे होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे मोलॅसिस योग्य त्या प्रमाणात दिले गेले पाहिजे.     


डॉ. अक्षय जगदीश वानखडे

एम. व्ही. एस. सी. (पशु पोषण व आहार शास्त्र)
फाईन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई
मोबाईल नंबर 8657580179