जनावरांतील वात किंवा तिवा
सर्वसाधारण जी काम करणारी बैले असतात किंवा गायींमध्ये यात प्रामुख्याने देशी गाईचा समावेश होतो, हा प्रकार आढळतो. हा रोग नाही तर जनावरातील मागच्या पायातील Elbous joint ची disorder आहे. माणसात गुडघ्याची वाटी जशी असते तसेच प्रत्येक जनावरात ही वाटी मागील पायातील Febiur (मांडीचे हाड) व त्याखालील Tibia या दोन हाडांमध्ये ही वाटी (Patella) बसलेली असते. पायाच्या हालचालीप्रमाणे ही वाटी मागे-पुढे होत रहाते. पण जेंव्हा ही वाटी वरच्या म्हणजे Femur हाडाच्या खोबणीत (Trochlea) जावून वरच अडकते त्यावेळी जनावरांना चालण्याचा त्रास होतो व ही व्याधी दिसते. आपल्याकडील देशी जनावरात व प्रामुख्याने गायींमध्ये व बैलांमध्ये ही व्याधी दिसते.
कारणे :
या व्याधीचे नेमके कारण अद्यापी सापडले नाही परंतु डोंगराळ भागातील जनावरामध्ये ह्याचे प्रमाण पुष्कळ आहे. तसेचं काही शास्त्रज्ञ ह्या व्याधीचे कारण अनुवंशीकही समजतात. जनावरे अशक्त असली आणि मागील पाय हा नेहमीपेक्षा जास्त ताणला गेला तरीही ती व्याधी होवू शकते.
लक्षणे :
ह्या व्याधीचे प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
- सकाळी उठून ज्यावेळी जनावर चालायला सुरूवात करते, त्यावेळी ही व्याधी पटकन लक्षात येते.
- जनावर त्याचा मागील बहुतांशी एकच पाय, काही वेळा दोन्ही पाय हे मागे ताणले जातात. पाय सरळ होत नाही किंवा दूमडू शकत नाही.
- जनावर लंगडत लंगडत चालते.
- मागील पाय ताणलेल्या स्थितीत राहून दुमडू शकत नसल्यामुळे चालतांना पाय ओढत जाने परिणामी त्या पायाचे खुर जमीनीवर घासले जावून खुराची झीज होते.
- केंव्हा केंव्हा जनावर पाय खुरडत चालण्याऐवजी पायाला झटके देत चालते.
- कांही अंतर चालल्यावर जनावर परत सरळ चालु लागते व जनावराला व्याधीची बाधा आहे किंवा नाही हे ओळखु येत नाही. याचे कारण जनावर थोडे चालल्यावर पायात रक्ताभिसरण सुरू होवून (Warm up) पायातील दोष नाहीसा होतो.
- पायामध्ये जनावर ज्यावेळी दवाखान्यात येते त्यावेळी त्याला थोडा आराम देवून परत चालवले असता ही विकृती दिसून येते.
निदान :
ह्या रोगाचे निदान अत्यंत सोपे आहे व बहुतांशी शेतकरीच त्याचे निदान करून त्यास वात किंवा तिवा झाला असे सांगतात. नसता जनावरास विश्रांती नंतर चालवले असता ह्या व्याधीचे निदान होते.
उपाय :
जनावरांतील वात ह्या व्याधीचा उपायही अत्यंत सोपा व त्वरीत आहे. यामध्ये वाटीच्या मुख्य तीन स्नायु असतात. एक बाहेरील बाजूस, दूसरा मध्ये व तिसरा आत असतो. त्यापैकी आतला स्नायू हा ताठ आणि कमालीचा ताणलेला असतो. त्यामुळे ही वाटी (Patella) वर मांडीच्या हाडामध्ये सरकून तिथला खोबणीत बसते. हा आतील स्नायु साधारण मोठ्या जनावरांत करंगळीएवढा जाड असतो. त्या स्नायुला 11 बलेडने कापले असता ही व्याधी लगेच नाहीशी होते. कापलेल्या ठिकाणी टाके टाकायची गरज लागत नाही व जनावर त्वरीत बरे होवू होवून नेहमी सारखे चालायला लागते. तेंव्हा शेतकर्यांनी त्यांच्या जनावरास हा रोग झाला असल्यास त्वरीत उपचार करून घ्यावा.
डॉ. अरुण भोकरे
पी एच डी (सर्जरी), पुणे, महाराष्ट्र |
डॉ. के. आर. शिंगल
पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार
|